Saturday, 30 April 2011

पहिली भेट

भावनांची हुल्लड, विचारांचा गोंधळ
समज़, विवेक न् इच्छा-अपेक्षांची हुज्जत
उत्सुक आणि चिंतित स्वप्नं झोप नेऊ लागले पळवून
तुझ्या पहिल्या चाहुलीने..

गोड बातमीचे गुपित पोट गेले दुखवून
ओकार्‍यांचा सपाटा, जगाला बोभाटा..
आत्तापर्यंतच्या आईवडिलांना, आजीआजोबांच्या जगात आणले फ़िरवून
तुझ्या पहिल्या जाणिवेने..

बेतांवर बेत, नावांच्या याद्या
कपड्यांचा आक्रोश, आंबलेली पाठ न् हत्तीची चाल,
या कुशीवरून त्या कुशीवर हाडांनी केला प्रवास सुरु
तुझ्या पहिल्या लाथेने..

संपलेले त्राण, जीव नाकातोंडाशी आलेला
वेदनांचा कल्लोळ, माया लागली पणाला,
देवाच्या जगातून, माणसांच्या जगात येता येता, तुझ्या आईचा झाला पुनर्जन्म,
तुझ्या पहिल्या श्वासाने...

थेंब खळकन घसरले डोळ्यांच्या कडेवरून
हसू हळूच ओघळले ओठांच्या मुडपांतून
सुख न् दु:खामधल्या सीमारेषाच गेल्या वितळून
तुझ्या पहिल्या स्पर्शाने..

Tuesday, 1 September 2009

काय हवं असतं माणसाला???

काय हवं असतं माणसाला?
एक भांडखोर स्वप्न
                 जे वास्तवाशी सतत भांडत असतं
एक वास्तवातला क्षण
                 जो स्वप्नातल्यासारखा वाटावा
                 काळ थांबावा आणि त्या क्षणाचं आयुष्य व्हावं.



काय हवं असतं माणसाला?
एक ध्येय
                 जे नेहमी लपाछुपीत जिंकतं...
एक जिंकलेला डाव,
                 लपाछुपीतला....



काय हवं असतं माणसाला?
एक माणूस हक्काचं
                  ज्याला सगळं काही सांगता यावं,
                  ज्याचं सगळं काही ऎकता यावं.
एक संवाद
                  जो न बोलता व्हावा...



काय हवं असतं माणसाला?
एक आकाश मोकळं
                   जे कधीही  संपू नये कितीही उडलं तरी
एक घर
                   माणसांनी बांधलेलं.



काय हवं असतं माणसाला?
एक श्वास
                    श्वासात मिसळून जाणारा,
                    ऑक्सिजन देणारा
एक मिठी
                    जिच्यात शिरलं की कळावं,
                    This is where I belong...



काय हवं असतं माणसाला?
एक तृप्त आयुष्य
                      ज्यात काही करायचं राहून गेलं नसेल.
एक मरण
                      जे जगावंसं  वाटावं.

तुमचा आमचा बेत

नेहमीचं काय शब्दांनी माझ्या मनातलं सांगायचं? मी त्यांना सगळं काही सांगते, अगदी मनाच्या कोपर्‍यात खोलवर दडवलेल्या गोष्टीसुद्‍धा.... ते मात्र मुळीच त्यांच्या अंतरंगात काय चाललंय त्याचा पत्ता लागू देत नाहीत.
लिहिणारा लिहितो - शब्द सांडतात... वाचणारा वाचतो - अर्थ उमजतात... या सगळ्या खेळात शब्दांनी अख्ख्या जगाच्या नकळत शेकडो वर्षे त्यांच्या भावना, ती कान्हा-मात्रांची खलबते, ते अकारा-ऊकारांचे हुंकार आणि तो जगप्रसिद्ध दोन ओळींमधला गर्भितार्थ (तो "between the lines" वाला..) अगदी काळजीपूर्वक लपवून ठेवलं आहे.
ते काही नाही, आता मात्र या शब्दांच्या सार्‍या गुपितांचं भांडं मी फ़ोडणार आहे.
बेत तर चांगलाच ठरला आहे. पण वाटतं तेवढं सोपंही नाहीए काम... कारण त्यांची गुपितंही मला त्यांच्याच मदतीने फ़ोडायला लागणार आहेत, तेही त्यांच्या नकळ्त....(कान जरा इकडे करा - code words मध्ये करायला लागणार आहे हे सगळं, अगदी हुशारीने ) तेव्हा लक्षपूर्वक वाचा बरं का, शब्दांना आपला बेत कळता कामा नये...